बैलगाडीचं शिल्पांकन असलेले दुर्मिळ वीरगळ साताऱ्यातील नागठाणे आणि सांगलीतील विटे गावात आढळले
विटे आणि नागठाण्यात आढळले वीरगळ
सांगली | बैलगाडीने प्रवास करताना वाटेत दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत वीरमरण आलेल्या प्रवाशाचा दुर्मिळ वीरगळ सांगली जिल्हयातील विटे आणि नागठाणे (जि. सातारा) येथे आढळून आले आहेत. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर, मानसिंगराव कुमठेकर आणि महेश गुरव यांनी याबाबत संशोधन केले आहे.
प्राचीन काळात एखादा वीर पुरूष धारातीर्थी पडल्यावर त्याच्या स्मरणार्थ स्मारकशिळा उभ्या करतात. त्याला ‘वीरगळ’ म्हणतात. हे वीरगळ वैविध्यपूर्ण आकारात शिल्पांकीत केलेले असतात. अशा वीरगळावर खालच्या टप्प्यात संबंधीत वीर पुरूषाने केलेल्या लढाईचे शिल्प असते. त्यानंतरच्या टप्प्यात वीर पुरूषाला अप्सरा घेऊन जात आहेत, असे शिल्प असते. अगदी वरील भागात सदराचा वीर शिवलिंग किंवा त्याच्या आराध्य देवतेची पूजा करताना दाखविलेलाअसते. वीरगळ हे महाराष्ट्रात गावोगावी आढळतात.
ज्या योद्धयाच्या किंवा व्यक्तिच्या स्मरणार्थ वीरगळ उभारले जातात, त्या व्यक्तिला कोणत्या कारणास्तव वीरमरण आले याचे शिल्पांकन खालील वीरगळाच्या टप्प्यात केलेले असते. कधी सदरचा वीर घोडयावरून, हत्तीवरून किंवा उंटावरून लढाई करताना दाखवतात. तर कधी तटावरून लढताना किंवा रथातून, नौकेतून लढताना दाखवतात. अनेक ठिकाणी तो वीर गाई-गुरांच्या रक्षणार्थ धारातीर्थी पडल्याचे दाखवण्यात येते.
मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंग कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी नुकताच स्त्रीरक्षणार्थ धारातीर्थी पडलेल्या वीराचा दुर्मिळ वीरगळ कोथळी येथे शोधला आहे. काही वेळा हिंस्त्र प्राण्यांशी लढताना वीरमरण आल्याचे शिल्पांकन वीरगाळावर असते.
मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर हे गेली अनेक वर्ष वीरगळांवर अभ्यास करीत आहेत. त्यांनी दक्षिण महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण वीरगळ शोधून काढले आहेत. सदर वीरगळांसंदर्भात त्यांचे एक पुस्तकही प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
वीरगळांचा अभ्यास करीत असताना प्रा. गौतम काटकर, मानसिंग कुमठेकर आणि महेश गुरव यांना खानापूर तालुक्यातील विटे येथे भैरवनाथ मंदिरात आणि सातारा जिल्हयातील नागठाणे येथील ओढयाकाठच्या महादेव मंदिरात दोन दुर्मिळ वीरगळ आढळले. सदरच्यावीरगळ अभ्यासासाठी बाळासाहेब निपाणे-पाटील, (मिरज), सचिन भादुले (विटा), वैभव कोले (लेंगरे) यांचे सहकार्य लाभले.
सदर वीरगळांची बारकाईने पाहणी केली असता, त्यावर खालील टप्प्यात एक व्यक्ति बैलगाडीतून प्रवास करताना दाखविली आहे. बैलगाडीला दोन बैल जुंपले असून त्याचा दोर गाडी चालवणाऱ्याच्या हातात आहे. गाडीमध्ये मागील बाजूस एक व्यक्ति बसलेली दाखवली आहे. सदरचे दोन्ही वीरगळ सुमारे चार फुट उंचीचे आहेत. नागठाणे येथील सदरचा वीरगळ मंदिराच्या छतामध्ये बसवला आहे.
बैलगाडीचे शिल्पांकन असलेले वीरगळ महाराष्ट्रात खूपच दुर्मिळ आहेत. या वीरगळाचा अभ्यास केला असता बैलगाडीने प्रवास करणाऱ्या व्यक्तिच्या स्मरणार्थ हा वीरगळ उभारल्याचे अनुमान करता येते. संबंधीत व्यक्ति ही व्यापारी अथवा प्रवाशी असावी. वाटेत दरोडेखोरांशी किंवा वाटमाऱ्यांशी झालेल्या झटापटीत त्याला मृत्यू आला असावा. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक या वीरगळावर अधिक संशोधन करीत असून, लवकरच या संदर्भातील संशोधन लेख संशोधन पत्रिकेत प्रसिध्द करण्यात येणार आहेत. वीरगळावरील या लेखाच्या संशोधनाने सांगली जिह्याच्या प्राचीन इतिहासात मोठी भर पडली आहे.
संकलन : सुमित रवि सरवदे
Comments
Post a Comment